सोनई, (वार्ताहर )- महावितरणचा प्रवाह सुरू असलेल्या वीजवाहक तारा दि. 4 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कावळ्याचा जथा बसल्याने दोन तारांचा स्पर्किंग होऊन रस्त्यावरच पडल्या. मोठी रहदारी असलेल्या राहुरी- शनिशिंगणापूर रोडवरील बसस्थानकासमोर हा प्रकार घडला. तेथे उपस्थित असलेले भूषण खंडागळे, भाऊराव चांदघोडे, बापू गवळी यांनी प्रसंगावधान दाखवून तारेच्या आजूबाजूला उभे राहून वाहतूक रोखली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
जवळच असलेल्या पेपर स्टॉलवरील वाचकांची एकच धावपळ उडाली होती. यावेळी मोठी गर्दी झाली होती. एक मोटारसायलस्वार जीव वाचवण्यासाठी ब्रेक दाबून बाजूला पडला, अन्यथा नागरिकांना उघड्या डोळ्यांनी मृत्यूची सकाळ पाहावी लागली असती.
एक महिन्यापूर्वी एक कावळा तारेला चिकटून मृत झाला होता, त्याच ठिकाणी दररोज दोन ते चार कावळे येत, पण काल अचानक मोठा जथा तारेवर बसताच तारा एकमेकांना घर्षण होऊन रस्त्यावरच तारा पडल्या. नदीपात्रातील रस्ता क्रॉस करून दोन विद्युत्प्रवाह वाहणारे पोल आहे. त्याखालून मोठी वाहतूक सुरू असते, त्यावरील तारा ब्रिटिश काळातील असल्याने कधीही तुटून पडतात.
दरम्यान, महावितरणच्या गलथान कारभारामुळे जनावरे, मनुष्य हानी झालेली आहे. क्रॉसिंग विजेच्या तारा खाली सुरक्षेच्या दृष्टीने जाळी ही नाही. बसस्थानक समोरील दुसरा पोल असून त्यास जाळीही नाही. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी याकडे लक्ष देतील का,असा सवाल नागरीक करत होते. जुनाट तारा, वाकलेले पोल बदलून टाकण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी सरपंच धनंजय वाघ यांनी केली.