नगर – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आजारी असताना मोदी सरकारने ईडीमार्फत चौकशी सुरू केली आहे. कॉंग्रेस नेतृत्वाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केंद्रात सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे. गैरसमज निर्माण करून जनतेची दिशाभूल सुरू आहे. मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे षडयंत्र राबवित आहे. असे असले तरी देखील संबंध देश कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडी चौकशीला बोलावून आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडविणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात जुन्या बसस्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलने कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हार घालून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी “बंद करा, बंद करा, तपासांतरांचा गैरवापर बंद करा, संविधान विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध असो’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“खूप झाली दडपशाही देशात हवी लोकशाही, ईडी, आयटी, सीबीआय असल्या धमक्यांना आम्ही भी घालत नाय, लावल्या चौकशा जरी कितीही मागे आम्ही हटणार नाही, मोदी सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही, देशासाठी बलिदान देणाऱ्या गांधी कुटुंबावर आरोप करताना लाज कशी वाटत नाही’? असे फलक शहर जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये झळकत होते.
यावेळी आमदार लहू कानडे, शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, साई संस्थानचे विश्वस्त करण ससाणे, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिव हेमंत ओगले आदींची आक्रमक भाषणे झाली.
मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, उपाध्यक्ष अशोक शिंदे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अंकुश कानडे, मागासवर्गीय कॉंग्रेस विभागाचे संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.