काळभोर – येथील एंजल हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या करण राहुल चिले या विद्यार्थ्याचे चेन्नई येथील ‘नोशन प्रेस’ यांनी ‘द बडगी बर्ड’ हे पुस्तक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे लोणी काळभोर परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, करण चिले या अवघ्या 16 वर्षाच्या मुलाचे ‘द बडगी बर्ड’ हे पुस्तक प्रसिध्द झाल्यामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. करणला लहानपणापासून पक्षी आवडत होते. पक्ष्यांना खाऊ घातले की ते पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ घेऊन जातात. ते पाहताना त्याला आनंद वाटत होता. पक्ष्यांवर असलेले प्रेम पाहून करण चिले याने पक्षी पाळण्याचे ठरविले. करणने 10 वर्षापूर्वी पुण्यातून दोन बडगी बर्ड पक्षाची जोडी विकत आणली. करण हा स्वत: त्या पक्षांची देखभाल करीत असे.
करण चिले याने गेल्या 10 वर्षात बडगी बर्ड या पक्ष्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास केला. आणि त्यावर ‘द बडगी बर्ड’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक चेन्नई येथील ‘नोशन प्रेस” ने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाला पक्षीप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
करण चिले याने ‘द बडगी बर्ड’ या लिहिलेल्या पुस्तकात बडगी बर्ड या पक्षाच्या जीवनक्रमाच्या संदर्भात सविस्तर माहिती लिहिली आहे. बडगी बर्ड या पक्षामधील नर-मादी कशी ओळखणे, पक्ष्यांना राळे, मका, भात व फळे यांसारखे अन्नपदार्थ आहार म्हणून खाण्यासाठी देणे. पक्षांची काळजी कशी घ्यायची. अशी महत्वाची माहिती चिले याने या पुस्तकात लिहिली आहे.
बडगेरिगर ज्याला बडगी किंवा पॅराकीट देखील म्हणतात, हा एक लहान, चमकदार रंगाचा पक्षी आहे. जो मूळचा ऑस्ट्रेलियाचा आहे. हे पक्षी जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर पाळीव पक्षी आहेत. हे पक्षी त्यांच्या खेळकर आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात.
-करण चिले,लेखक द बडगी बर्ड