हिंजवडी – दवाखान्यात अॅडमिट असलेल्या वडिलांना भेटायला गेलेल्या हिंजवडीतील तरुणाचा सूसमध्ये एका डंपरने चिरडून बळी घेतला. महिनाभरात डंपर अपघातात बळी जाण्याची ही चौथी घटना आहे. ही दुर्दैवी व हृदयस्पर्शी घटना सूसच्या मुख्य चौकात ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारी (दि. 13) सकाळी नऊच्या सुमारास घडली.
अक्षय अशोक भोईने (वय 24) रा. सध्या हिंजवडी, बेंद्रे वस्ती असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचे वडील अशोक भोईने हे हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी नांदे येथील सिम्बॉयसीस रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून अॅडमिट होते. तर त्याची आई देखील सतत आजारी असल्याने ती लेकीकडे कात्रजला राहत होती. वडिलांना जेवणाचा डबा घेऊन अक्षय त्याच्या दाजीच्या दुचाकी (क्रमांक एमएच 12 एलके 2060) गाडीवरून रुग्णालयात गेला होता. रुग्णालयातून पुन्हा घरी परतत असताना सूसमध्ये मागून भरधाव वेगाने आलेल्या (एमएच 12 यु एम 0016) क्रमांकाच्या डंपरचालकाने त्यास डाव्या बाजूने चिरडले.
या अपघातात दुचाकी मागील चाकाखाली पडल्याने अक्षयचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी लोकांनी त्याला मागील दोन टायरच्या गॅपमधून ओढून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. आमचा श्रावण बाळ हरपला असा आक्रोश त्याचे आईवडील करत होते. घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी त्याच्या खिशातील ओळ्खपत्रावरून नातेवाइकांना संपर्क साधला. त्यानुसार औंध रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
डंपरचालक श्रीमंत सदाशिव भांगे (वय 43) रा. शिवलीला हाईट्स, रायकर मळा, धायरी हा घटनेनंतर तत्काळ पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांना संपर्क केला असता ते म्हणाले, या घटनेतील वाहनचालकाला अटक केली आहे. त्यास शिक्षा होईल अशा पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत. संबंधित डंपर पोलिसांनी जप्त केला आहे.
ऐका महिन्यात घडलेल्या घटना
हिंजवडी हद्दीत गेल्या महिन्यात एका आयटीतील तरुणीचा डंपरने चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच माणमधील ठाकर वस्तीवरील एका महिलेला देखील अशाच पद्धतीने चिरडले होते. अन्य एका अपघातात देखील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आयटीनगरीमध्ये बेफाम व बेफिकीर सुटणार्या डंपरचालकांना आवर घालण्याचे मोठे आव्हान हिंजवडी पोलीस व वाहतूक पोलिसांसमोर उभे राहिले आहे. आयटीतील तरुणी तर एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यांचीच मुलगी होती. तरी देखील पोलीस प्रशासन डंपरचालकांना समज द्यायच्या ऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.