नेवासा -छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपालांविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगर जिल्हामध्ये मराठा क्रांती मोर्चा, जीवन ज्योत फाऊंडेशनने निषेध व्यक्त करत राज्यपाल कोश्यारी यांचे धोतर फाडणाऱ्याला 2 लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्याचा निषेध करत जिल्हात मराठा क्रांती मोर्चा,अहमदनगर जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र चे कमलेश नवले यांचे बॅनर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि कायम राहणारच. उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध आहे. त्यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास 2 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असा मजकूर या बॅनरवर आहे.
राज्यपाल सातत्याने अशी बडबड का करतात, असा प्रश्न पडला आहे. मी म्हणतो त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं नवले यांनी म्हटले आहे.