हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिकात्मक ,पुतळा जाळणाऱ्या आणि जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुंदा पोलीस ठाण्यात रविवारी (ता 9) रात्री हा गुन्हा दाखल झाला.
केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
शिवसेनेचे पक्ष चिन्ह तसेच नाव गोठल्यामुळे हिंगोलीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अनेक ठिकाणी आंदोलने केली. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रविवारी सकाळी तरुणांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठविल्याच्या कारणावरून तरुणांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतीकारात्मक पुतळ्याचे दहन केले.
पांगरा शिंदे येथील या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे जमादार तुकाराम अम्ले यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणे तसेच जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे
या आंदोलकरांवर गुन्हा
पोलिसांनी विजय शिंदे,गजानन शिंदे,संतोष शिंदे,शंकर शिंदे,कल्याण शिंदे,सुनील शिंदे,सुधाकर शिंदे,उत्तम शिंदे,केशव शिंदे यांच्या सह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे जमादार भोपे पुढील तपास करीत आहेत.