लोणावळा, (वार्ताहर) – तुंगार्ली परिसरातील एका बंगल्यात रात्री अपरात्री मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम लावुन, त्यावर अश्लिल हावभाव करून गोंधळ घालणाऱ्या सहन नतिकांसह 9 जणांच्या विरुद्ध लोणावळा शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे. अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री नंतर एस 4 नावाच्या बंगल्यात रात्री उशीरा पर्यंत साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी लावून सोबत आणलेल्या नर्तिकाकडून अश्लिल हावभाव करुन नाच करीत होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या बंगल्यावर छापा टाकला. पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेऊन साउंड सिस्टम जप्त केले.
मागील आठवड्यातच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पाटण गावात एका खाजगी बंगल्यात सुरू असलेल पॉर्न फिल्म रॅकेट उध्वस्त केले. त्यानंतर अश्लिल नृत्याचा प्रकार समोर आल्याने भाड्याने दिले जाणारे खासगी बंगले आणि त्यात चालणारे बेकायदेशीर कृत्य याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांचेकडील बंगला भाड्याने देताना त्यांचे बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घेतील. बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करतील. अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
भाड्याने देत असलेल्या बंगल्याची माहिती द्या
लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणाऱ्या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून सुरू आहे. ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन आपल्या बंगल्याची माहिती सादर करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.