बंगळुरू – कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत केजीएफ-2 या ब्लॉकबस्टर चित्रपटातील संगीताचा अवैध वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या तीन नेत्यांविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केजीएफ-2 चित्रपटातील संगीताचे हक्क एमआरटी म्युझिक कंपनीकडे आहेत. त्या कंपनीने दिलेल्या तक्रारीनंतर राहुल, जयराम रमेश आणि सुप्रिया या कॉंग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कॉपीराईट कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत संबंधित गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार, रमेश यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर यात्रेचे दोन व्हिडीओ अपलोड केले. त्या व्हिडीओंमध्ये केजीएफ-2 मधील गीत-संगीताचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी कुठली परवानगी घेण्यात आली नव्हती. आमच्या संगीताचा लाभ घेण्याचे प्रयत्न गैरमार्गांनी करण्यात आले आहेत, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित घडामोडीबाबत कॉंग्रेसकडून तातडीने कुठली प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.