भोर, (प्रतिनिधी ) – भोरचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पै. माऊली कोकाटे यांने पै. हर्षवर्धन सदगीर याला चिटपट करुन श्री वाघजाई देवीचा किताब पटकावला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पैलवान प्रतिष्ठानच्या आखाड्यास भेट देऊन मुलींच्या कुस्त्यांचा आनंदही घेतला.
भोर शहराचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या यात्रा उत्साहात पार पडली. श्री वाघजाई देवी ट्रस्टच्या वतीने माघ शु. पोर्णिमा शनिवार (दि. २४) रोजी श्री वाघजाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त सकाळी ६ ते ९पर्यंत देवीस महाअभिषेक, महापूजा व महाआरती नंतर श्री वाघजाई मंदिर येथून देवीचा छब्बीना व काठी पालखी सोहळा संपन्न झाला.
दुपारी ४ वाजता श्री वाघजाई देवी मैदानावर पैहिलवान प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच भव्य कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यशवंत डाळ व जवाहर कुस्ती संकुलचे अध्यक्ष बाबु शेटे यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन झाले.
यावेळी यात्रा कमिटी सदस्य सचिन मांडके, एकनाथ रोमण, बाळासाहेब खुटवड, किसन चोरघे, किसन कारळे,सुरेश वालगुडे, पंकज खुर्द, सचिन चोरघे,लक्ष्मण राऊत, राहुल शेटे, सोनल साळुंखे, किरण आंबिके, अमित जाधव, दशरथ कांबळे, नितीन सोनवले आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून राष्ट्रीय पंच सुनील शेटे, गणेश मोहिते, सागर मोरे, रमेश किवळे, चंद्रकांत पवार, संतोष शेटे यांनी काम पाहिले.
यावेळी प्रथम क्रमांक पै. माऊली कोकाटे विरुध्द पै. हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये झालेल्या लढतीत पै. माऊली कोकाटे विजयी होऊन श्री वाघजाई देवी किताबाचा मानकरी ठरला. गटनेते यशवंत डाळ यांच्या वतीने २ लाख ५० हजाराचे इनाम व चांदीची गदा देण्यात आली. तर द्वितीय क्रमांक पै. पृथ्वीराज मोहोळ याने पै संग्राम पाटील याचा पराभव करून पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या वतीने मोहोळ याला २ लाखाचे इनाम देण्यात आले.
तृतीय क्रमांक पै. अक्षय गरुड विरुद्ध पै. संग्राम साळुंखे यांच्यात बरोबरीची कुस्ती झाली असून दीड लाख रुपये इनाम नितीन थोपटे यांच्यात वतीने देण्यात आले. चतुर्थ क्रमांक पै. समीर शेख याने मनिष रायतेचा पराभव करून भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदार देशपांडे यांच्या वतीने शेख याला एक लाख रुपयांचे इनाम देण्यात आले. पाचवा क्रमांक अगंद बुलबुले विरुद्ध गौरव हजारे यांच्यात लढत होऊन हजारें हा विजेता ठरला असून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस सचिन मांडके यांच्या वतीने ७५ हजार रु. इनाम देण्यात आले.
अडीचशे मल्लांचा सहभाग
या कुस्ती आखाड्यात २५० मल्लांनी सहभाग घेतला तर यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पैलवान सहभागी झाले होते. रु. ५१ ते २ लाख ५० हजारापर्यंत पैहलवानांना इनाम देण्यात आले. विठ्ठल दानवले यांनी सूत्रसंचालन केले. हटकेश्वर धायगुडे व राहूल शेटे यांनी निवेदक म्हणून काम पाहिले. रविवार (दि.२५) रोजी गटनेते यशवंत डाळ यांच्या वतीने शहरातील महिला व पुरुषांसाठी गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रा आयोजित केला होता. दरम्यान, पैलवान प्रतिष्ठानच्या कुस्त्या आखाड्याचे हे दुसरे वर्ष असल्याचे यशवंंत डाळ यांनी सांगितले.