कर्जत – कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द गावचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. ओंकार ईश्वर आवटे (वय 25) असे या कारवाईत अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे चांदे खुर्द येथील 30 वर्षीय शेतकरी आहेत.
त्यांनी सरकारच्या गाय गोठा योजनेंतर्गत पंचायत समिती कर्जत येथे प्रकरण सादर केले होते. ते मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवकाने शेतकऱ्याकडे 7 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार 11 एप्रिलला विभागाच्या पथकाने चांदे खुर्द येथे जाऊन पडताळणी केली. पडताळणीदरम्यान ग्रामसेवकाने कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याकडून गाय गोठ्याचे प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडे अमोल जाधव यांच्याकरिता 7 हजार रुपये लाचेची मागणी करून प्रथम 5 हजार रुपये व काम झाल्यानंतर 2 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत विभागाने रचलेल्या सापळ्यामध्ये ग्रामसेवकाला 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी काम पाहिले. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी काम पाहिले. या पथकामध्ये पोलीस अंमलदार रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक दशरथ लाड, हारुण शेख यांचा समावेश होता.