बंगळुरू – भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून निवडणूक रिंगणात न उतरण्याची सूचना आल्याचा दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी केला. तर, माजी उपमुख्यमंत्री के.एस.ईश्वराप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेण्याचा इरादा बोलून दाखवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या कर्नाटकात भाजपचे ज्येष्ठ नेते अडगळीत पडण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या वरिष्ठांकडून मला एक संदेश आला. तुम्ही ज्येष्ठ आणि माजी मुख्यमंत्री आहात. आता इतरांसाठी मार्ग मोकळा करून द्या असे मला सांगण्यात आले, अशी माहिती 67 वर्षीय शेट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. मला दोन ते तीन महिने आधी सांगितले गेले असते तर काही वाटले नसते. आता उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे.
ऐनवेळी संदेश देण्यात आल्याने मी दुखावलो आहे. उत्तर कर्नाटक विभागात पक्षाची उभारणी करण्यासाठी मागील 30 वर्षे मी कठोर मेहनत घेतली, अशी भावना विद्यमान आमदार असणाऱ्या शेट्टर यांनी बोलून दाखवली. विधानसभेचे सभापती, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी याआधी सांभाळल्या.
भाजपचे कर्नाटकमधील आणखी एक ज्येष्ठ नेते असणाऱ्या 74 वर्षीय ईश्वराप्पा यांनी पत्रकारांशी स्वतंत्रपणे बोलताना निवडणूक रिंगणात न उतरण्याचा मानस बोलून दाखवला. उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार न करण्याचे आवाहन त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला केले. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ईश्वराप्पा यांना मागील वर्षी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना यावेळी उमेदवारी न देण्याच्या पर्यायावर पक्ष विचार करत असल्याचीही जोरदार चर्चा होती. माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या समवेत मागील 4 दशकांत पक्ष उभारणीत ईश्वराप्पा यांनी मोठे योगदान दिले.
टिश्यू पेपरसारखा येडियुरप्पांचा वापर
कर्नाटकमधील भाजपच्या उमेदवार निवडीसाठी दिल्लीत सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि कर्नाटकमधील नेते उपस्थित होते. मात्र, बंद दाराआड झालेल्या त्या चर्चेत येडियुरप्पा यांना सहभागी करून घेण्यात आले नव्हते, असा दावा करणारे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला. वापरून झाल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या टिश्यू पेपरसारखा येडियुरप्पा यांचा वापर केला जात आहे, असे कॉंग्रेसने म्हटले. त्यातून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला.