हैदराबाद – एनटीआर गार्डनमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा तब्बल 125 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी मूर्तिकार पद्म भूषण राम वनजी सुतार कृष्णा देखील उपस्थित होते.
१४ एप्रिल २०१६ रोजी या पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली होती. शासनाने 16 सप्टेंबर 2020 रोजी प्रकल्पासाठी 146.50 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. त्यासाठी निविदा प्रक्रिया करून निविदा मेसर्स केपीसी प्रोजेक्ट्स लिमिटेड, हैदराबादला देण्यात आली. हैद्राबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या हुसेन सागर तलावाजवळ 11.4 एकरात दीडशे कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभारण्यात आले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, “केवळ दलित, आदिवासी, बहुजनच नव्हे तर भारतातील लोकांना भेदभावाचा सामना करावा लागला. पण बाबासाहेबांमुळे त्यांना आता सन्मान मिळाला. त्यांच्यासाठी आपण जे काही करू ते कमीच आहे.” यावेळी त्यांनी राज्य सचिवालयाला देखील बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणार असल्याचे सांगितले.
ही मूर्ती 2 एकर परिसरात तयार करण्यात आली आहे. याचा तळ 50 फूट असून रुंदी 45.5 फूट आहे. तर यात 791 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. पुतळ्याच्या परिसरात संग्रहालय, फोटो गॅलरी, लायब्ररी उभारण्यात येणार आहे. याशिवाय परिसरात सार्वजनिक शौचालये, कँटीन, उद्यानेही तयार करण्यात येणार आहेत.