पुणे – दापोडे (वेल्हे) येथील हॉटेल चालकावर गोळीबार केल्याप्रकरणात दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. संदीप उर्फ सॅण्डी धुमाळ (वय.20, आंबेगाव खुर्द), रूपेश उर्फ भैय्या पालखे (वय 20, रा. जांभुळवाडी रोड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार फरार आहे. दोघांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. हॉटेल चालक विलास बोर्गे (वय 40, रा. करंजावणे ता. वेल्हे) यांच्यावर आरोपींनी गावठी पिस्तूलीतून 3 राउंड फायर करत गंभीर जखमी करून दुचाकीवरून पळ काढला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व हॉटेल चालकामध्ये पाणी बॉटलच्या कारणातून वाद झाला होता. त्यातून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी हॉटेलचालक आरोपींच्या अंगावर धावला होता. त्यावर आरोपींनी गावठी कट्टा काढून धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोळीबार केला होता. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात (दि.1) रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी वापरलेली गाडी दत्तात्रय पवार यांच्या नावावर असून, ती मुलगा सुजित हा वापरत आहे. त्यानुसार चौकशी केली असता, त्याने त्याची गाडी संदीप, रूपेश आणि श्याम काळे यांनी नेल्याचे सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेजवरूनदेखील दोघे संशयित निष्पन्न झाले होते. दरम्यान दोघेजण कुसगाव पूल येथे आहेत, अशी माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, पोलीस अंमलदार अमोल शेडगे जावळे, वाघमारे, पठाण, झेंडे, पासलकर, सचिन गायकवाड, प्रमोद नवले यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्यांनी गुन्हा केला आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना वेल्हा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.