काबुल – अफगाणिस्तानमधील कंदहार प्रांतामध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या जोरदार धुमश्चक्रीमध्ये तब्बल 175 तलिबानी दहशतवादी मारले गेले असल्याचे वृत्त पुढे आले आहे. यामध्ये तालिबानच्या अनेक वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा विषयक राष्ट्रीय संचलनालयातील सूत्रांनी स्पुटनिक वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.
या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंदहार प्रांतातील अरघांदाब जिल्ह्यात झालेल्या या चकमकीमध्ये तब्बल 175 दहशतवादी ठार झाले असून अन्य 26 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या सैन्याने रात्रभर केलेल्या या धडक मोहिमेमध्ये तालिबानचे 7 कमांडरही मारले गेले आहेत. मात्र या चकमकीदरम्यान तालिबानचे अल्प नुकसान झाले असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
कंदहारमध्ये गेल्या दिवसांमध्ये तालिबानी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दले आणि तालिबानींमधील चकमकींमध्येही वाढ झाली आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याकडून तालिबानी अड्डयांवर हवाई हल्ले आणि थेट तोफांचाही मारा केला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले गेल्याचा दावा अफगाण सैन्याने केला आहे.
शांतता चर्चेमध्ये विशेष प्रगती नाही…
कतारची राजधाने दोहा इथे अफगाण सरकार आणि तालिबान प्रतिनिधींमध्ये शांतता चर्चेची कोंडी कायम आहे. याच कालावधीत ही धुमश्चक्री जोरात सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून दीर्घकालीन आणि शांततेसाठीच्या शस्त्रसंधीचा आग्रह धरला गेला आहे. मात्र 12 सप्टेंबरपासून या चर्चेला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये फारच थोडी प्रगती झाली आहे.