पुणे – मागील महिन्याभरात शहरातील करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे प्रशासनासह पुणेकरांना दिलासा मिळला आहे. मात्र, करोनाचा “ताप’ कमी होत नाही तोच डेंग्यूचा “ताप’ वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरासह राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने डासांची मोठी पैदास होत आहे. त्यामुळे शहरात “ऑक्टोबर हिट’ ऐवजी डेंग्यू रुग्णांचा “ताप’ वाढत आहे.
शहरात गेल्या दहा महिन्यांत 1 हजार 451 संशयितांपैकी केवळ 61 जणांना लागण झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्युच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी आता पुढील तीन महिने डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची भिती दर्शवली जात आहे. दरम्यान, वर्षभरात 714 जणांना नोटिसा पाठवून कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पाण्याची डबकी साचून त्या ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या तयार झाल्या आहे. त्यामुळे विविध भागात डेंग्यूचे डास दिसत आहेत.
आता करोनाची तीव्रता कमी होत असताना हा “ताप’ सुरु झाला आहे. जुलै महिन्यापासून डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जुलै ते ऑक्टोबरर्यंत हे संशयितांची संख्या वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात 54 रुग्ण आढळले आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. त्याचा परिणाम म्हणून या महिन्यात डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात 44 रुग्णांना लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात पाण्याची डबकी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे मनपा