बोगस व्यक्ती उभ्या करून शासनाची फसवणूक
सातारा (प्रतिनिधी) – बोगस व्यक्ती उभ्या करून नेले, ता. सातारा येथील गट नं. 611 मधील मिळकतीच्या विक्री प्रमाणपत्राचा बनावट दस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. मूळ हिस्सेदार म्हणून बोगस व्यक्ती खऱ्या असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव (रा. नेले, ता. सातारा) व एक अन्य एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग 2) विजय शहाजी जगताप (वय 52, रा. नीतिराज निवास, अहिरे कॉलनी, देगाव रोड, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2019 मध्ये बोगस दस्त झाल्याची तक्रार नेले, ता. सातारा येथील रामदास गुलाबराव जाधव यांनी दुय्यम निबंधक कार्यालयास दिली होती. त्यानुसार या कार्यालयाने तपासणी व चौकशी केली असता, 7 जून 2010 रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात गट नं. 611 मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावरील सहहिस्सेदार मधुकर यदू पवार, मारुती यदू पवार, व छबुबाई दशरथ निकम होते; परंतु 32 ग विक्री प्रमाणपत्र नोंदणीकामी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-2, सातारा यांच्यासमोर मारुती यदू पवार यांच्या जागी अनोळखी बोगस व्यक्ती व मधुकर यदू पवार यांच्या जागी नेले येथील जगन्नाथ गणपती जाधव या व्यक्तीला उभे करून जबाब दिले गेले होते.
दस्त नोंदणी करताना संगणकावर बोगस व्यक्तींचे फोटो घेऊन, ओळख पटवून देणारे व साक्षीदार म्हणून चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव दोघे (रा. नेले) हे उपस्थित होते. दस्त नोंदणीवेळी मारुती व मधूकर यदू पवार यांची सहहिस्सेदार बहीण उपस्थित असताना त्यांनीदेखील या फसवणुकीत संशयितांना साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव, छबुबाई दशरथ निकम व अनोळखी व्यक्तींनी संगनमताने बनावट दस्ताची नोंदणी केली करून, हा दस्त लिहून घेणारे म्हणून मधुकर यदू पवार यांच्याऐवजी जगन्नाथ गणपती जाधव यांना उभे करुन बनावट दस्त नोंदणी केल्याचे सुनावणीत निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि बाजीराव ढेकळे तपास करत आहेत.