तर अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडण्यात येईल : वैभवराव पिचड

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय निर्णय दोन दिवसांत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला. तसेच सडलेले, कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती केली व त्याची पोहच आम्हाला द्या, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, शिवाजी धुमाळ, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, सुरेश गभाले, सभापती ऊर्मिला राऊत व सदस्य उपस्थित होते. मागील तीन महिन्यांपासून धान्य नाही. आम्ही का पेंढा खायचा का? असा सवाल करून शेतातील धान्य अवकाळी पावसाने सडून, कुजून गेले.

अद्याप पंचनामे नाहीत. त्यामुळे नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पाचनई, पेठ्याची वाडी येथील 50 ग्रामस्थ तहसीलदार कार्यालयात आले. त्यांनी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली रेशन कार्ड मिळावे, रेशनदुकानाचा परवाना निलंबित करावा व जोपर्यंत धान्य मिळत नाही, तोपर्यंत तहसीलदार कार्यालया बाहेर जाणार नाही, असा निर्णय घेत पाच तास ठिय्या दिला. त्यामुळे अधिकारी वर्गाची धावपळ उडाली.

पेठेवाडीचे सरपंच गोविंदा घोगरे व ग्रामस्थांनी मागील तीन महिन्यांपासून मोफत धान्य सोडता काहीच मिळाले नाही. त्यात अस्मानी संकट आल्याने भात पीक नष्ट झाले. वावरात गुडघाभर पाणी असून, भात सडून, कुजून गेला आहे, असे म्हणत कुजलेले धान्य प्लास्टिक पिशवीत आणून ते तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना देवून मुख्यमंत्र्यांना पाठवून त्याची भाकरी करून खा म्हणावे. म्हणजे आम्हा गरिबांना न्याय मिळेल, अशी विनंती केली.

पिचड यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी गावातील 50 लोकांनी लेखी अर्ज देवूनही त्याची दखल घेतली नाही. जुलैचा अर्ज 10 ऑक्‍टोबरला काढला व अजूनही जर तुम्ही रेशन देत नसाल, तर त्या दुकानदाराचे लायसन्स रद्द करा व धान्य पोहच करा असे सुनावले. यावेळी नायब तहसीलदार गोसावी (गिरी), पुरवठा अधिकारी रावते, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दोन दिवसांत पेठेवाडी येथे धान्य पाठविण्याचे कारवाईचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.