पुणे- साथीच्या पहिल्या काही आठवड्यांतच करोनाचा पहिला “हॉटस्पॉट’ बनलेला भवानी पेठेचा प्रवास करोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. दाटीवाटीच्या या परिसरात करोनाचे सर्वाधिक बाधित सापडले आहेत. त्यानंतर मागील सहा महिन्यांत पहिल्यांदाच या भागात अवघे 3 नवे बाधित बुधवारी आढळले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.
शहरात पहिला करोनाबाधित सिंहगड रस्ता परिसरात मार्चमध्ये आढळला. त्यानंतर या साथीचे बाधित येरवडा आणि भवानी पेठ परिसरात वाढण्यास सुरूवात झाली. कासेवाडी तसेच आसपासच्या परिसरात करोना संसर्गाचा कहर झाला. याच भागातील मंजुळाबाई चाळीत तब्बल 200 हून अधिक बाधित आढळल्याने खळबळ उडाली होती.
त्यानंतर या भागात रोजच्या बाधितांचा आकडा 100 वर गेला होता. मात्र, त्यानंतर प्रशासनाने या भागात कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी, वर्दळीवर बंधने आणत जास्तीत जास्त चाचण्या करून संशयितांना वेगळे केले. परिणामी, या भागातील बाधितांची संख्या कमी होण्यास सुरूवात झाली आहे. पुढील सलग सात ते आठ दिवसांत ही संख्या शुन्यापर्यंत येईल, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
ढोले-पाटील रस्ता परिसरालाही दिलासा
ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसराचा प्रवासही करोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. या हद्दीत दाटीवाटीच्या ताडीवाला रस्ता झोपडपट्टी परिसरात करोनाने बस्तान मांडले होते. येथे 2 हजारांहून बाधित होते. हा भागही करोनामुक्तीच्या दिशेने जात असून, परिसरात गेल्या 3 दिवसांत अवघे 3 बाधित सापडले आहेत.
मार्चपासून आपण करोनाशी देत असलेल्या लढ्याला यश येत असून सर्वांत आधीचे हॉटस्पॉट आता करोनामुक्तीच्या दिशेने आहेत. महापालिकेने केलेल्या कामाची ही पावती आहे. मात्र, धोका अद्यापही टळलेला नसून सर्वांनी मास्क वापरणे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर