मुंबईचा “सूर्य’ तळपला

आबूधाबी -सूर्यकुमार यादवची आक्रमक खेळी तसेच अन्य फलंदाजांच्या उपयुक्‍त फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा पाच गडी राखून पराभव केला व थाटात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. विजयासाठी आवश्‍यक धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनाही अपयश येत होते. मात्र, महत्त्वाच्या क्षणी बेंगळुरूच्या गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी केली. तसेच त्यांच्या खेळाडूंनी अत्यंत सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण केले त्यामुळे मुंबईचा विजय सोपा ठरला.

तत्पूर्वी, देवदत्त पडीक्कलच्या आक्रमक खेळीनंतरही अन्य फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूची घसरगुंडी उडाली. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख फलंदाजांना बाद केल्यामुळे बेंगळुरूचा डाव 20 षटकांत 6 बाद 164 धावांवर रोखला गेला.

मुंबईचा कर्णधार कॅरन पोलार्डने नाणेफेक जिंकून बेंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दुखापतीमुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा याही सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी जोश फिलीप्सला सलामीला फलंदाजीला उतरवले. त्याने पडीक्कलसह संघाला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, त्यानंतर तो आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 24 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावताना 33 धावा केल्या.

तो बाद झाल्यानंतर बुमराह, कर्णधार पोलार्ड व ट्रेन्ट बोल्ट यांनी बेंगळुरूच्या फलंदाजीची वाताहत केली. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीही बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. त्याच्यासह भरात असलेला एबी डीविलियर्सही अपयशी ठरला. त्याला पोलार्डने बाद केले. त्यानंतर बुमराहने शिवम दुबे व स्थिरावलेला पडीक्कल यांनाही बाद केले.

दुसऱ्या बाजूने बोल्टने ख्रिस मॉरिसला बाद केले. त्यावेळी बेंगळुरूच्या 6 बाद 136 धावा झाल्या होत्या.
पडीक्कलने एकाकी किल्ला लढवला मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याने 74 धावांची खेळी करताना 45 चेंडूत 12 चौकार व 1 षटकार फटकावला. तळात वॉशिंग्टन सुंदर व गुरकिरतसिंग मान यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे बेंगळुरूला दीडशतकी धावांचा पल्ला पार करता आला.

रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 6 बाद 164 धावा. (देवदत्त पडीक्कल 74, जोश फिलीप्स 33, एबी डीविलियर्स 15, गुरकिरतसिंग मान नाबाद 14, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 10, जसप्रीत बुमराह 3-14, कॅरन पोलार्ड 1-5, ट्रेन्ट बोल्ट 1-40, राहुल चहर 1-43).

मुंबई इंडियन्स – 19.1 षटकांत 5 बाद 166 धावा. (सूर्यकुमार यादव नाबाद 79, इशान किशन 25, हार्दिक पंड्या 17, कॅरन पोलार्ड नाबाद 4, महंमद सिराज 2-28, यजुवेंद्र चहल 2-37)

बीसीसीआयने केला धोनीचा गौरव
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या संघ निवडीवरून वाद निर्माण झालेले असताना बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा गौरव केला आहे. करोनाचा धोका कमी झाल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच दौरा आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने धोनीने भारतीय क्रिकेटची सेवा केल्याबद्दल आभार मानले आहेत. बीसीसीआयने आपल्या ट्‌विटर हॅंडलच्या कव्हर पेजवर धोनीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली, धन्यवाद एमएस धोनी… असा संदेशही पोस्ट केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.