भोपाळ -भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांची मंगळवारी भेट झाली. मध्यप्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना ती भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री पायलट कॉंग्रेसच्या प्रचारासाठी मध्यप्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. त्यानंतर ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या आधीच्या पक्षातील (कॉंग्रेस) सहकाऱ्याची भेट घेतली. त्या भेटीबाबत पायलट यांनी जाहीर वाच्यता टाळली. मात्र, ज्योतिरादित्य यांनी भेट घेतल्याची माहिती देताना त्यांच्यातील चर्चेचा तपशील पत्रकारांच्या हाती लागू दिला नाही.
मध्यप्रदेशात सगळ्यांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे मी पायलट यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. लोकशाहीत सर्वांना प्रचार करण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.
ज्योतिरादित्य यांनी मार्चमध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे समर्थक असणारे 25 आमदार राजीनामा देत भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यामुळे मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार कोसळले आणि भाजपला पुन्हा सत्ता मिळाली.
मध्यप्रदेशातील घडामोडी ताज्या असतानाच जुलैमध्ये पायलट आणि त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे पायलट हेही ज्योतिरादित्य यांच्या वाटेने जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, गेहलोत आणि पायलट यांच्यात पॅच-अप झाल्याने राजस्थानमधील राजकीय पेच संपुष्टात आला.