एनडीए म्हणजे नॅशनल डिस्ट्रक्‍शन अलायन्स – वृंदा कारत

पाटणा – भाजप पुरस्कृत रालोआ आघाडी म्हणजे राष्ट्रीय विनाश आघाडी आहे, त्यांच्या विनाशकारी धोरणाचा सर्वात मोठा फटका बिहार मधील स्थलांतरीत कामगारांना बसला आहे याला ही जनता या निवडणुकीत योग्य उत्तर देईल असे प्रतिपादन मार्क्‍सवादी नेत्या वृंदा कारत यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केले.

या निवडणुकीत बिहार मध्ये महाआघाडीला प्रचंड बहुमत मिळेल असा दावाहीं त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की राज्यातील जनतेचे मत भाजप-जेडीयु सरकारच्या विरोधात असून येथील जनता हे सरकार उलथून टाकण्याच्या निर्णयाप्रत आली आहे असेहीं त्यांनी यावेळी नमूद केले.

त्या म्हणाल्या की करोनाच्या काळात अचानक करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे लोकांचा सन्मानाने जगण्याचा हक्कच हिरावला गेला आहे. बिहार मधील नितीशकुमार सरकार अतिशय निर्दयी असून त्यांच्या सरकारच्या काळात लक्षावधी लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यांची कुटुंबे आज रस्त्यावर आली आहेत.

लॉकडाऊनच्या काळात बिहार मधील स्थलांतरीतांना शेकडो मैलाची पायपीट करावी लागली होती. त्यावेळी त्यांना झालेला मनस्ताप हे नागरीक विसरणार नाहीत असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.