पुणे – यंदा वाचकप्रेमी दिवाळी पुस्तक प्रदर्शनाला मुकणार आहेत. करोना पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून दिवाळी पुस्तक प्रदर्शनाला अद्यापही परवानगी मिळालेली नसून ती मिळेल याबाबतची स्पष्टताही नाही.
परिणामी आयोजकांनीदेखील यंदा हॉल आरक्षित केलेले नाही. परवानगी मिळाल्याशिवाय हॉल आरक्षित केल्यास पैसे वाया जातील, ही भीती त्यांना सतावत आहे.
याबाबत पुण्यातील एका नामांकित बुक गॅलरीचे संयोजक नाव न छापण्याच्या अटीवर दै. “प्रभात’शी बोलताना म्हणाले, दरवर्षी आम्ही दिवाळी पुस्तक प्रदर्शन अत्रे सभागृहात भरवतो. परंतु, यंदा पालिकेकडून प्रदर्शनाबाबतची नियमावली पाठविली गेली नाही.
त्यांच्याकडून कोणतीच स्पष्टता नसून प्रदर्शन भरविल्यास नियमभंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईस आम्हाला समोरे जावे लागेल. या भीतीमुळे 26 वर्षांची परंपरा यंदाच्या वर्षी खंडित होईल, असेच चित्र आहे. हॉटेल, बारमालकांना दंड भरण्यास परवडू शकते, मात्र आम्हाला दंड कसा काय परवडेल, असे सांगत पालिकेने आम्हाला शशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अन्य गोष्टी अनलॉक; पुस्तक प्रदर्शन मात्र लॉकच
राज्यासह पुण्यामध्ये करोनाची स्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. परिणामी अनेक गोष्टी खुल्या केल्या गेल्या आहेत. हॉटेल-बार, मॉल, जीम-व्यायामशाळा, क्रीडा सराव, विपश्यना केंद्र, आठवडे बाजार आदी गोष्टी सुरू केल्या आहेत. परंतु, पुस्तक प्रदर्शनालाच अद्याप पुणे महापालिकेकडून परवानगी न मिळाल्याने वाचकप्रेमींसह संयोजकही हताश झाले आहेत.