caबीजिंग – तैवानला शस्त्रास्त्रे पुरवल्याबद्दल बोईंग आणि लॉकहीड मार्टीन यासारख्या प्रमुख संरक्षण कंपन्यांवर निर्बंध घालण्याचा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेकडून तैवानला आधुनिक शस्त्रास्त्रांची विक्री करण्याच्या मुद्दयामुळे चीन आणि अमेरिकेतील तणाव आणखीनच वाढला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानला 135 “स्टॅन्डॉफ लॅन्ड अटॅक मिसाईल एक्स्पांडेड रिस्पॉन्स’ ही क्षेपणास्त्र यंत्रणा विकण्याच्या व्यवहाराला मान्यता दिल्यावर चीनने ही प्रतिक्रिया दिली आहे. या संरक्षक क्षेपणास्त्र यंत्रणेची किंमत अंदाजे 1 अब्ज डॉलर इतकी आहे.
या व्यतिरिक्त अमेरिकेने तैवानला 436.1 दशलक्ष डॉलर किंमतीची 11 अतिउच्च दर्जाची रॉकेट सिस्टीम एम-142 लॉन्चर, त्याच्याशी संबंधित उपकरणे आणि 367.2 दशलक्ष डॉलर किंमतीची 6 एमएस-110 रेकी पॉड देण्याचेही मान्य केले आहे.
अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्रे विकण्याने “वन चायना’ धोरणाला धक्का पोहोचेल. तसेच चीनच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षिततेच्या उद्दिष्टांनाही धोका पोहोचेल. त्यामुळे अमेरिकेने तैवानशी परस्पर कोणताही व्यवहार करू नये आणि नियोजित शस्त्रास्त्र विक्रीचा व्यवहार रद्द करावा, असे आवाहन चीनने यापूर्वीही अमेरिकेला केले होते. त्याचाच पुनरुच्चार चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी सोमवारी केलेल्या वार्तालापामध्ये केला.
बोईंग, लॉकहीड मार्टीन आणि रेथोन या कंपन्यांवर चीनचे निर्बंध असणार आहेत. अमेरिका आणि चीनदरम्यान फारसे संरक्षण विषयीचे व्यवहार नाही. त्यामुळे या निर्बंधांचा या कंपन्यांवर काय परिणाम होणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.