पुणे – शहरातील बहुतांश मॉल्सकडून “आरोग्य सेतू’ ऍपची तपासणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे. मॉल्समध्ये शिरल्यानंतर प्रत्येक नागरिकाने मोबाइलवर हे ऍप डाऊनलोड केले आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी तेथील कर्मचाऱ्यांची आहे. केंद्र सरकारने तसा आदेशही काढला असून महापालिकेने देखील अनिवार्य केले आहे. परंतु, बहुसंख्य मॉल्सकडून या नियमाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
राज्यासह शहरातील मॉल्स 5 ऑगस्टपासून सुरू झाले. करोना पार्श्वभूमीवर पाच महिन्यांहून अधिक काळ ते बंद असल्याने त्यांचे अर्थकारण बिघडले होते. त्यामुळे मॉल्स सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. परंतु, नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासणारे थर्मल स्क्रीनिंग वगळता अन्य कोणतीही विशेष खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, अनेक मॉल्समधील फूड जॉइन्ट्ला नागरिकांची गर्दी होत असून यामुळे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांकडे “आरोग्य सेतू’ ऍप आहे की नाही, याबाबतदेखील कोणतीही विचारणा होत नसून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.