पुणे – नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास केले जातात. घटस्थापना शनिवारपासून (दि.17) होत आहे. या पार्श्वभूमीवर उपवासासाठी लागणाऱ्या भगर, साबुदाणा, शेंगदाण्याला मागणी वाढली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा भगरीच्या भावात 10 टक्क्यांनी वाढ झाली. शेंगदाण्याच्या भावातही वाढ झाली असून, साबुदाण्याच्या भावात मात्र पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली.
मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारात सध्या नाशिक येथून दररोज 30 ते 40 टन भगर विक्रीस पाठविली जात आहे. ओरिसा, छत्तीसगड, कर्नाटक येथील शेतकरीही भगरीचे उत्पादन घेतात. नाशिक येथील प्रक्रिया उद्योगात भगरीवर प्रक्रिया होते. तेथून देशभरात माल विक्रीस पाठविला जातो.
गेल्यावर्षी भगर उत्पादन घेणाऱ्या भागात पाऊस कमी झाला. सध्या नवरात्रोत्सवासाठी भगरीला मोठी मागणी असून भावात तेजी आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापारी आशिष दुगड यांनी दिली.