टोकियो – पूर्व चीन समुद्रातील सेन्काकू बेटांजवळच्या जपानच्या सागरी हद्दीत चीनच्या दोन टेहळणी नौकांनी घुसखोरी केली आहे. जपानच्या तटरक्षक दलाने आज याबाबतची माहिती दिली. जपानच्या सागरी हद्दीमध्ये चीनकडून गेल्या आठ वर्षात झालेली ही सर्वात मोठी घुसखोरी आहे, असे जपानने म्हटले आहे.
चीनच्या टेहळणी नौकांनी रविवारी जपानच्या सागरी हद्दीमध्ये प्रवेश केला असून त्या अजूनही (मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत) जपानच्या तैशो बेटाजवळ जपानच्याच सागरी हद्दीमध्ये आहेत, असेही जपानने म्हटले आहे.
जपान सरकारने 2012 मध्ये सेन्काकू द्वीपसमूहातील काही बेटे खासगी जपानी मालकांकडून विकत घेतली होती. त्यानंतर या द्वीपसमूहाच्या परिसरात चीनच्या गस्ती नौकांनी केलेली ही सर्वात मोठी घुसखोरी आहे, असे मानले जात आहे.
जपानच्या तटरक्षक दलाच्या गस्ती नौका या परिसरामध्ये तैनात केल्या गेल्या असून त्यांनी चीनच्या नौकांना त्वरित जपानची सागरी हद्द सोडून जाण्याचा इशाराही दिला आहे. चीनच्या नौकांनी या वर्षात 18 वेळा जपानच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी केली आहे, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.