…म्हणून क्रीडाप्रेमींकडून सायनावर टीकेची झोड

बेंगळुरू – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पी. कश्‍यप यांनी डेन्मार्क ओपन स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. करोनाच्या धोक्‍यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कोणत्याही स्पर्धा होत नव्हत्या. मात्र, आता काही स्पर्धा सुरू झाल्या असूनही सायनासारख्या खेळाडू यातून माघार का घेतात, असेही प्रश्‍न सध्या क्रीडाप्रेमी विचारत आहेत. 

येत्या 13 ऑक्‍टोबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा एकदा प्रारंभ होत आहे. करोनामुळे जवळपास सहा महिने सर्व स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, पी. व्ही. सिंधूने यापूर्वीच माघार घेतली होती, तर सायना व कश्‍यपने चार दिवसांपूर्वी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.

नव्या वर्षात होत असलेल्या आशियाई स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगत करोनाच्या धोक्‍यामुळे डेन्मार्क स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने समर्थन केले आहे. करोनाचा धोका कायम असल्यामुळे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यानंतर जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या नियोजित स्पर्धा तसेच थॉमस-उबर करंडक स्पर्धा व आशिया खंडात होत असलेल्या तीन पात्रता स्पर्धा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. 

सायना व सिंधूच्या माघारीमुळे यंदाच्या डेन्मार्क स्पर्धेत महिला एकेरीत भारताचा एकही खेळाडू सहभागी होणार नसल्याची घटना प्रथमच घडणार आहे. पुरुष गटात मात्र, किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, अजय जयराम व शुभंकर डे हे खेळाडू सहभागी होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.