स्थापना दिन संचलनाचे ग्रुप कॅप्टन सागर मधुकर परांजपे यांनी केले नेतृत्व
पुणे – वयाच्या 49व्या वर्षापर्यंत वायुसैनिकांच्या संचलनाचे नेतृत्व करणे ही एक अतिशय साहसी बाब आहे. मात्र, ही जबाबदारी अतिशय नेटाने पार पाडत पुण्यातील ग्रुप कॅप्टन सागर मधुकर परांजपे यांनी आपल्या शौर्याची पुन्हा एकदा अनुभूती दिली आहे.
भारतीय वायुसेनेचा 88वा स्थापना दिवस गुरुवारी (दि.8) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी दिल्ली येथील हिंडन एअरफोर्स स्टेशन येथे आयोजित भव्य कार्यक्रमप्रसंगी वायुसेनेच्या 207 अधिकारी, जवानांनी दिमाखदार संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन सागर मधुकर परांजपे यांनी केले. ग्रुप कॅप्टन परांजपे हे पुण्याचे रहिवासी असून, पौड रस्त्यावर जोग हॉस्पिटल शेजारी ते राहतात. त्यांचे वडील डॉक्टर आहेत. ग्रुप कॅप्टन परांजपे यांचे शालेय शिक्षण अभिनव शाळेत मराठी माध्यमातून तर 11वी, 12वी विज्ञान शाखेतून फर्गसन कॉलेजमधून झाले आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 84व्या तुकडीचे ते माजी विद्यार्थी आहेत. ग्रुप कॅप्टन परांजपे 1994 मध्ये वायुसेनेच्या फ्लाइंग ब्रांचमध्ये वैमानिक म्हणून ते रुजू झाले. ते प्रमाणित वैमानिक प्रशिक्षक असून वायुदलाच्या प्रशिक्षण संस्थेत बराच काळ प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मिग ऑपरेशन फ्लाइंग प्रशिक्षण तुकडी (एमओएफटीयू) या तुकडीचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. वायुसेनेसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना “वायुसेना मेडल’ने गौरविण्यात आले आहे. मिग 21 या विमानाबद्दल सविस्तर माहिती असलेले “लिगसी ऑफ ए लिजंड’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून हवाईदलातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
वयाच्या 49व्या वर्षापर्यंत वायुसेनेच्या संचलनाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. यापूर्वी त्यांनी 2018 मध्ये देखील या संचलनाचे नेतृत्व केले होते. वायुसेना दिवसाच्या संचलनाचे दोन वेळा नेतृत्व करणारे सर्वात वयस्कर अधिकारी आहेत, अशाप्रकारची ही बहुधा पहिलीच घटना असावी, अशी भावना वायुसेनेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.