पुणे – राज्य सरकारने रेल्वे सेवेला परवानगी दिल्यानंतर, बहुप्रतीक्षित मध्य रेल्वेने “इंटरसिटी’ गाड्यांनादेखील “हिरवा झेंडा’ दाखवला आहे. 9 ऑक्टोबरपासून मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांसाठी दररोज 5 गाड्यांच्या जोड्या सोडण्यात येणार आहेत. मात्र, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षण असणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश असणार आहे.
पहिल्या टप्प्यात पुणे ते लोणावळा लोकल सुरू करण्यात येणार आहे. तर, मध्य रेल्वेच्या वतीने बुधवारी राज्यात 5 जोड्या “इंटरसिटी’ सोडण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) पुणे, गोंदिया, सोलापूर आणि नागपूर या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.
दुरोंतो, इंद्रायणी, डेक्कन क्वीन आणि सिद्धेश्वर या गाड्यांप्रमाणेच यांच्या थांब्यांची रचना आहे.
या सुपरफास्ट विशेष गाड्यांचे बुकींग 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट आरक्षित होणार आहे.
या गाड्यांमध्ये केवळ “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांनाचा प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी चढते-उतरतेवेळी आणि प्रवासादरम्यान करोनासंबंधिच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.