लंडन – संगणकीय त्रुटीमुळे ब्रिटनमध्ये सोळा हजार करोनाग्रस्तांची नोंदच करायची राहिली असल्याचा प्रकार उघडकीला आला असून या प्रकाराच्या चौकशीचा आदेश त्या देशाच्या सरकारने दिला आहे.
या घटनेच्या संबंधात माहिती देताना ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, संगणकाच्या ऑटोमेटेड ट्रान्स्फर फाइल्समुळे ही समस्या निर्माण झाली. त्यामुळे सुमारे 16 हजार नवीन करोनाग्रस्तांची नोंदच करायची राहिली. तथापि, नवीन सिस्टीममध्ये या सगळ्या केसेस घेण्यात आल्या असून त्या सर्वांना शोधूनही काढण्यात येत आहे.
त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून ते ज्यांच्या संपर्कात आले होते त्यांचाही आता शोध घेतला जात आहे. 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळातील करोनाच्या 15 हजार 841 रुग्णांच्या केसेस नोंदवल्याच गेल्या नव्हत्या.
हे रुग्ण जवळपास 50 हजार लोकांच्या संपर्कात आले आहेत. त्यांचा शोध जारी असला तरी तो अजून पूर्ण यशस्वी झालेला नाही, त्यामुळे या रोगाचा ब्रिटनमधील फैलाव वाढला असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी मान्य केले.
दरम्यान, याप्रकरणी विरोधी पक्षांनी त्या सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले अ्रसून सरकारच्या निष्काळजीपणामुळे हजारो लोक नाहक करोनाच्या विळख्यात सापडले आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.