दुबई – अमिरातीत यंदा सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत असून एक समान चिंता दोन्ही संघांना सतावत आहे. दोन्ही संघांच्या आजवर झालेल्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजांना येत असलेले अपयश कधी संपुष्टात येणार यासाठी त्यांना सरावात भर द्यावा लागणार आहे.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह संघातील प्रमुख फलंदाजांना येत असलेले अपयश कसे दूर करता येईल, यासाठी त्यांना आता आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
मुरली विजय, शेन वॉटसन, रवींद्र जडेजा, सॅम कुरेन यांना सातत्य राखता आलेले नसल्याने त्यांना आतापर्यंत झालेल्या सामन्यात समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विजय व वॉटसन यांना आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात भक्कम सलामी देता आलेली नाही. त्यामुळे त्यांना सलामी जोडीसह मधल्या फळीतील फलंदाजीचाही प्रश्न सोडवावा लागणार आहे.
कर्णधार धोनी, फाफ डुप्लेसी यांनीच संघाच्या फलंदाजीचा भार वाहिला असला तरीही त्यांच्या पदरी अपयशच जमा झाले आहे. फिरकी गोलंदाजी करून अष्टपैलू म्हणून संघात असलेला केदार जाधवही गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही चमक दाखवू शकलेला नाही. गोलंदाज दीपक चहर, लुंगी एन्जीडी, रवींद्र जडेजा व सॅम कुरेन यांना गोलंदाजीतही सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.
दुसरीकडे हैदराबाद संघाने कामगिरी सरस केली असली तरीही त्यांनाही मधल्या फळीतील प्रश्न भेडसावत आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
फिरकी गोलंदाज रशिद खान व वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजीमुळे यश आले. खलील अहमद, टी. नटराजन व अभिषेक शर्मा यांना मिळालेल्या संधीचा लाभ घेता आलेला नाही. मिशेल मार्शने दुखापतीने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतल्याने जेसन होल्डरचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.