शहराला मिळाले नवे आरोग्य प्रमुख
पुणे – पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची बुधवारी बदली झाल्यावर चार तासांतच डॉ. आशिष भारती या नव्या आरोग्यप्रमुखांची नेमणूक राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने केली. डॉ. भारती यांच्याकडे सध्या राज्याच्या आरोग्य खात्याच्या सहाय्यक संचालक पदाची जबाबदारीही आहे. त्यांची महापालिकेत एक वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली असून दोन दिवसांत ते पदभार स्वीकारतील.
महापालिकेतील आरोग्य प्रमुखपदावर डॉ. हंकारे यांची 25 सप्टेंबर 2018 मध्ये प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली होती. ती पुढच्या दोन वर्षांसाठी असल्याचे राज्य सरकारने आदेशात स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉ. हंकारे यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत 25 सप्टेंबर 2020ला संपली.
परंतु, करोनाची वाढती साथ लक्षात घेता राज्य सरकारने महापालिकेत दोन आरोग्यप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डॉ. हंकारे यांच्या बरोबरच डॉ. नितीन बिलोलीकर यांची नेमणूक करण्यात आली. परंतु, त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर ते रजेवर गेले.
तेव्हा डॉ. अंजली साबणे यांच्याकडे आरोग्य प्रमुख पदाचा पदभार आला. डॉ. बिलोलीकर अद्यापही रजेवर असल्याने आता एक वर्षांसाठी का होईना नवे आरोग्यप्रमुख महापालिकेला लाभले आहेत.