नवी दिल्ली – देशातील कोविड-19 ची साथ आणि काही राज्यांमध्ये असलेल्या पूरस्थितीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
‘यूपीएससी’च्या प्राथमिक फेरीची परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. पूरस्थिती आणि कोविड-19 ची स्थिती आटोक्यात यावी, यासाठी किमान 2-3 महिने या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
ही मागणी न्या. ए.एम.खानविलकर, न्या. बी.आर.गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या पिठाने फेटाळून लावली आणि कोविड-19 च्या साथीमुळे अखेरची संधी असलेले उमेदवार परीक्षेला उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली.
या वर्षीची ‘यूपीएससी’ची परीक्षा 2021 च्या परीक्षेबरोबर एकत्रितपणे घेतल्याने उमेदवारांची मोठी गर्दी होईल, असे सांगून ती मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. परीक्षांच्या आयोजनासाठी सर्व आवश्यक उपाय योजना करण्यात आलेल्या असून अतिरिक्त व्यवस्थाही करण्यात आलेल्या आहेत, असे सांगून ‘यूपीएससी’नेही परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला विरोध केला होता.
‘यूपीएससी’च्या काही परीक्षा अलिकडेच यशस्वीपणे घेतलेल्या असल्याने प्राथमिक परीक्षा घेतल्या जाणे शक्य असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.