ग्राहकांकडूनच वेळप्रसंगी घेतली जाते साधनसामग्री
पुणे – महावितरण कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडूनच शिडी, बांबू अशी साधनसामग्री उधारीवर घेण्याची वेळ आली आहे. खुद्द एका कर्मचाऱ्यानेच दै. “प्रभात’शी बोलताना ही माहिती दिली. निसर्ग चक्रिवादळामुळे शहरातील अनेक भागांतील बत्तीगुल झाली होती. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या ओव्हरहेड वायरवर पडल्या.
त्या हटविण्याकरिता महावितरणकडे माणसे आहेत. मात्र, आवश्यक साधनसामग्री नाही. फांदी हटवण्याच्या कामासाठी लागणारी शिडी, बांबू, घोडा (लहान शिडी) आदी साहित्य प्रशासनाकडून उपलब्ध होत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, 6 जून रोजी बिबवेवाडी येथील एका सोसायटीमध्ये मध्यरात्री 2 वाजता दिवे गेले. तक्रार आल्यानंतर आम्ही तातडीने दोन कर्मचारी स्पॉटवर गेलो. झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर पडल्याने शॉर्टसर्किटमुळे दिवे गेल्याचे दिसले.
मात्र, आमच्याकडे ती हटवण्यासाठी आवश्यक साहित्य नव्हते. ग्राहकालाच तुमच्याकडे मोठा बांबू आणि शिडी असल्यास घेऊन या, अशी विनंती केली. संबंधीत ग्राहकाने या दोन्ही गोष्टी उपलब्ध केल्याने लगेचच फांदी हटवत वीज पूरवठा सरळीत झाल्याची आठवण कर्मचाऱ्याने सांगितली.
आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असल्यास महापालिकेचा उद्यान विभाग किंवा फायर ब्रिगेडकडून मदत घेतली जाते. मात्र, एखादी लहानशी फांदी ओव्हरहेड वायरवर कमी उंचीवर पडली असल्यास आमचे साहित्य वापरले जाते. साहित्याची टंचाई आहे किंवा कर्मचाऱ्यांना ती देण्यात येत नाही, असे मला वाटत नाही. तरीही याबाबत माहिती घेतली जाईल.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे