नगर -महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा नगर जिल्ह्यातील विस्तार आज जाहीर करण्यात आला. परिषदेच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे यांनी निवड करण्यात आली असून, उत्तर जिल्हाध्यक्षपदाची संधी निवृत्ती बडाख यांना देण्यात आली आहे.
सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते पाटील यांनी ही माहिती दिली. सरपंच परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी निर्मलाताई मालपाणी यांना देण्यात आली असून, परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी बाळासाहेब आव्हाड यांना संधी देण्यात आली आहे.
सरपंच परिषदेच्या कोअर कमिटीची सभा मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिंगणगाव (ता. नगर) येथील आदर्श ग्रामपंचायतीच्या सभागृहांमध्ये सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्ता काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश सचिव विकास जाधव, महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली.
हिंगणगाव (ता. नगर) गावचे आदर्श सरपंच आबासाहेब सोनवणे यांची जिल्हाध्यक्ष (दक्षिण), मालुंजा (ता. श्रीरामपूर) गावचे सरपंच निवृत्ती बडाख यांची जिल्हाध्यक्ष (उत्तर), तसेच राहुरीच्या निर्मलाताई मालपाणी यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तसेच वडुलेचे (ता. शेवगाव) सरपंच बाळासाहेब आव्हाड यांची जिल्हा कार्याध्यक्ष (दक्षिण) नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्याचे अध्यक्ष काकडे यांनी सरपंच परिषदेच्या कामाचा आढावा घेतला. ग्रामपंचायती आणि सरपंच त्यांच्यासमोरील प्रश्न व आव्हाने यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या सरपंच परिषदेच्या सदस्यांचा सत्कार पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.