- मिळकतकर थकबाकीसाठी योजना लागू करण्याच्या हालचाली
- स्थायी समितीच्या खास सभेत निर्णय होण्याची शक्यता
पुणे – मिळकतकर थकबाकीवरील दंड आणि व्याजावर “अभय’ योजना लागू करण्याबाबत महापालिका स्थायी समितीने गुरूवारी तातडीची खास सभा बोलावली आहे. योजना लागू करण्याबाबत भाजप शहराध्यक्षांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांना सूचना दिली होती.
वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, महेंद्र पठारे, प्रकाश ढोरे, उज्ज्वला जंगले, नंदा लोणकर, अमृता बाबर, राजेंद्र शिळीमकर, आमदार सुनील कांबळे, सुनीता गलांडे, दीपक पोटे यांनी या खास सभेची मागणी केली आहे.
महापालिका हद्दीत मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या मोठी आहे. अनेक मिळकती अनधिकृत असल्याने अशा मिळकतींची दरआकारणी तिपटीने दराने करण्यात आली आहे. या थकबाकीवर दरमहा 2 टक्के दराने दंडाची आकारणी होत असल्याने थकबाकीची रक्कम अधिक असल्याचे दिसून येते. सध्या करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव “अभय’ योजना लागू करण्याबाबत या खास सभेत ठराव देण्यात येणार आहे.
मोबाइल टॉवर्सची थकबाकी वगळणार
मोबाइल टॉवरची मिळकतकर थकबाकी वगळून अन्य मिळकतींना ही सवलत मिळू शकणार आहे. ही बाब प्रस्तावात स्पष्ट आहे. एकूण 5739 कोटी 50 लाख रुपये थकबाकीपैकी 1143 कोटी 41 लाख रुपये थकबाकी ही केवळ मोबाइल टॉवरचीच आहे. एवढेच नव्हे, टॉवरच्या थकबाकीची मूळ मुद्दल शास्तीपेक्षा कमी आहे. शास्ती वगळता थकबाकी 531 कोटी 47 लाख 70 हजार 677 आहे; तर शास्तीची रक्कम 621 कोटी 94 लाख 8 हजार 410 रुपये आहे.