शिक्षण विभागाची कारवाई थंडावली : अल्पसंख्याक शाळेकडून पालकांची आर्थिक लूट
भोसरी – पिंपरी चिंचवड शहरातील खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट सुरूच आहे. त्यामध्ये आता अल्पसंख्याक शाळांचीही भर पडली आहे. चिंचवड येथील काळभोरनगर मधील सॅन्ट ऍन्ड्रयुस शाळेमध्ये पालकांकडून वह्या पुस्तकांच्या नावाखाली अतिरिक्त पैसे उकळले जात आहेत. मात्र याकडे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
कोणत्याही खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश आदींची खरेदी करण्यासाठी बंधने घालण्यास शासनाने मनाई केली आहे. अशा शाळा कारवाईस पात्र असल्याबाबत तसेच त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशाप्रकारे खासगी शाळांमध्ये सर्रास पुस्तके व वह्या विक्री केली जाते आहे.
याबाबत काही दिवसांपूर्वी पालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र त्यामध्ये पुन्हा खंड पडला असून शिक्षण विभागाची कारवाई थंडावली आहे. चिंचवड येथील सॅन्ट ऍन्ड्रयुस ही शाळा अल्पसंख्यांकमध्ये येत आहे. सध्या या शाळेमध्ये कोणत्याही परवान्याविना शालेय वस्तूंची विक्री केली जात आहे. बाजारामध्ये कमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या वह्या जास्त किंमतीमध्ये शाळेत विकल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी पालकांनी केल्या आहेत. मात्र या शाळेवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाने अनास्था दाखवली आहे.
निर्ढावलेली यंत्रणा
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सांस्कृतिक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी शाळेला पत्र दिले. त्या पत्राबाबत शाळेने शिक्षणधिकाऱ्यांच्या पत्राची मागणी केली. त्या पत्राला अनुसरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी शासकीय पत्रव्यवहार केला. मात्र या पत्रव्यवहाराला देखील शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवत दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला.
प्रवेशशुल्कासाठी आकारताहेत पैसे
या शाळेने नवीन प्रवेशासाठी दरवर्षी प्रति प्रवेश अर्जासाठी दोनशे रुपये रोख स्वरुपात आकारले जातात. मात्र त्याची पावती दिली जात नाही. त्यात पालकांचे अर्थिक नुकसान होत आहे. अल्पसंख्याकांचा दर्जा मिळालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील दुसऱ्या शाळा प्रवेश शुल्क न घेता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवितात. परंतु सॅन्ट ऍन्ड्रयुस शाळेत दोनशे रुपये इतक्या रकमेची आकारणी करुन प्रवेश अर्जाची विक्री केली जाते. प्रवेश रद्द केलेल्या पालकांचे पैसे परत करणे गरजेचे आहे तरी तसे न करता सरळसरळ पैशाचा अपहार या शाळेकडुन केला जात आहे. इतकी जास्त रक्कम शाळेत जमा होते तर या शाळेला अल्पसंख्यांक दर्जा कसा मिळाला असा प्रश्न पालकांकडुन उपस्थित केला जात आहे.
शाळेत वह्या, पुस्तके विक्री करणे गैर असून सॅन्ट ऍन्ड्रयुस या शाळेबद्दल कोणत्याही पालकांची तक्रार प्रशासन विभागाकडे न आल्याने मी कारवाई केलेली नाही. परंतु तक्रार प्राप्त झाल्यास किंवा वह्या, पुस्तके विक्री केल्याचा पुरावा मिळाल्यास शाळेवर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल.
– विलास पाटील, पर्यवेक्षक तथा तक्रार निवारण अधिकारी, शिक्षण विभाग
शासनामार्फत कोणत्याही शिक्षण संस्थेस वह्या, पुस्तके विक्री करण्याचा परवाना दिलेला नाही. अनाधिकृतपणे शाळेत वह्या, पुस्तके विक्री करतांना दिसून आल्यास सदर शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी