पुणे – करोना संसर्गामुळे सहा महिन्यापासून बंद असलेल्या कौटुंबिक न्यायालयातील बाररुम वकिलांना वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बार रुमचा वापर करताना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी याबाबत आदेश दिला आहे.
दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्याकडे, वकिलांसाठी न्यायालयातील बाररूम खुली करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मागील आठवड्यात न्यायाधीशांची उपस्थिती 100 टक्के करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 सप्टेंबरपासून दोन सत्रामध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे.
वकिलांकडून बार रूमचा वापर करताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात येईल, सुरक्षित अंतराचे पालन करण्यात येईल, असे नमूद करून बार रूम महिला आणि पुरुष वकिलांसाठी खुली करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली होती. प्रमुख न्यायाधीशांनी वकिलांची ही मागणी मान्य केल्याचे दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांनी सांगितले.