पुणे – पहिल्या विवाहाची माहिती लपवत तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरच्यांना माहिती न देता या दोघांनी रजिस्टर लग्नदेखील केले. त्यानंतर तरुणीने संबंधित तरुणाचा मानसिक छळ सुरू केला. त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उंड्री परिसरात उघडकीस आली.
या प्रकरणात पत्नीसह चौघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणाच्या काकाने तक्रार दिली आहे. ही घटना उंड्रीमध्ये जूनमध्ये घडली होती. त्यावेळी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. हा तरुण आणि एक तरुणी यांच्यामध्ये पाच वर्षांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांनी गुपचूप रजिस्टर लग्न केले होते.
मात्र, त्यांनी ही बाब आपल्या नातेवाईकांना न सांगता ते दोघेही आपापल्या घरी राहत होते. बाहेर भेटत असताना त्यांच्यात शारीरिक संबंध आले. या तरुणीचे अगोदरच लग्न झाले होते. असे असताना तिने तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते. तरुणाला तक्रार करण्याची धमकी देऊन ती वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती. या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यावर तेदेखील तरुणाला मानसिक त्रास देत होते.
तरुणाच्या घरच्यांना याची माहिती नसल्याने त्यांनी त्याचे नात्यात लग्न ठरवले होते. ही गोष्ट त्याच्या कथित पत्नीला समजल्यावर तिने त्याला पळून जाण्यासाठी दडपण आणले. पळून आला नाही, तर सर्व उघड करण्याची धमकी तिने दिली होती. याला कंटाळून या तरुणाने साखरपुड्याच्या आदल्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तरुणाच्या मित्रांकडून त्याचे रजिस्टर लग्न झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन घटनेच्या दिवशी या तरुणीचे पाच ते सहा फोन या तरुणाला आलेले निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.