पुणे – “महापालिकेने करोना बाधितांच्या तपासण्या करताना अँटिजेन कीटद्वारे चाचण्यांचे प्रमाण कमी केले आहे. केंद्र सरकाच्या निर्देशांनुसार आरटी-पीसीआर चाचण्या अधिकाअधिक घेण्यात येणार असून, त्यापेक्षा निम्म्या चाचण्या अँटिजेनद्वारे घेण्यात येणार आहेत,’ असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी गुरूवारी सांगितले.
महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दींसह 23 ठिकाणी कोविड चाचणी केंद्र सुरू केली आहेत. बाधिताच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून “आयसीएमआर’च्या आदेशानुसार अँटिजेन कीटचा वापर करण्यात येत आहे. अँटिजेन टेस्टची सत्यता 65 टक्क्यांपर्यंत असून, अर्ध्या तासात जागेवरच तपासणी अहवाल मिळत असल्याने अनेक नागरिक त्यालाच पसंती देतात.
विशेष करून नगरसेवकांनीही प्रभागामध्ये कोविड चाचणी केंद्र सुरू करून संशयितांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. परंतू मागील दोन दिवसांपासून महापालिकेने बहुतांश सेंटरवरील अँटिजेन कीटद्वारे केल्या जाणाऱ्या तपासण्या कमी केल्या आहेत. किंबहुना काही सेंटर्सवरील तपासण्याच बंद केल्याने तक्रारी येऊ लागल्या आहेत.
याबाबत अग्रवाल म्हणाल्या, ‘केंद्राच्या सूचनांनुसार आरटी-पीसीआर आणि अँटिजेन टेस्टचे प्रमाण 1:1 पेक्षाही कमी असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रात करोना संशयितांचा शोध घेण्यासाठी अँटिजेन टेस्ट वाढवल्या होत्या. मागील दोन ते तीन दिवसांपासून दररोज सरासरी सात हजार टेस्ट केल्या जात आहेत. त्यापैकी 5 हजार चाचण्या या आरटी-पीसीआर, तर अँटिजेन कीटद्वारे दोन हजार चाचण्या करण्यात येत आहेत.’