कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सूचना
कराड (प्रतिनिधी) – कराड तालुक्यातील अनेक गावांसह पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलमधील अनेक मोठ्या गांवामध्ये करोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. परंतू, तसे पाहिले तर या गावातील करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही 80 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. तरीही करोना रुग्ण सापडणाऱ्या गावांसह शहरातील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता देशमुख, कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, कराड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खैरमोडे व डॉ. धर्माधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यामार्फत जनजागृती करण्याच्या सूचना महसूल, ग्रामविकास विभागांना दिल्या असल्याचे ना. देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच गर्दी टाळण्या करीता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या. करोना संसर्ग फैलावू नये, याकरीता गर्दी टाळणे आवश्यक आहे. अनावश्यक घराबाहेर पडणे, सातत्याने मास्कचा वापर करणे हे जे उपाय जनतेच्या हातात आहेत ते जनतेने काटेकोरपणे करावेत, असे आवाहन ना. शंभूराज देसाई यांनी बैठकीच्या माध्यमातून लोकांना केले आहे.
यावेळी बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील करोना रुग्णांना आवश्यक ते उपचार देणे व उपचाराकरीता बेड उपलब्ध करुन देणेसंदर्भात पाटण येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सत्र सुरुच आहे. आमचे सुपने मंडल कराड तालुक्यात असलेतरी या विभागातील जनतेची तसेच सापडलेल्या करोना रुग्णांची काळजी घेणे माझे कर्तव्य असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.
जम्बो करोना सेंटर सुरू होण्यासाठी प्रयत्नशील
सातारा जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आमचे विनंतीवरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साताऱ्याला तातडीने करोनाचे जम्बो सेंटर सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. साताराचे जम्बो हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्याचा माझा व्यक्तीश: तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा प्रयत्न सुरु आहे. बेडवाचून उपचार मिळत नाहीत, असे होऊ नयेत याकरीता आम्ही प्रयत्नशील असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.