एमएचटी-सीईटीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 10 – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधीचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र(पीसीबी) गटाची परीक्षा 1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटाची परीक्षा 12 ते 16 ऑक्टोबर, 19 आणि 20 ऑक्टोबरला होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.
करोना विषाणू संसर्गामुळे सीईटी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने जेईई मेन्स आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची नीट या प्रवेश घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जेईई मुख्य परीक्षा झाली. तर 17 सप्टेंबरला नीट होणार आहे. त्यामुळे राज्यातील सीईटी कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. या परीक्षेसाठी 4 लाख 66 हजार 205 अर्ज आले आहेत.
या पाश्वभूमीवर सीईटी सेलने सुधारित तारखा जाहीर केल्या. सीईटीचे आयोजन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिल्यानंतर सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्याचे सीईटी सेलने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.