पुणे – अनलॉक-3 पासून शहरात दुकाने सुरू करण्यात आली आहेत. सध्या व्यवसाय करण्यासाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी आहे. पण, ही वेळ वाढवण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
शहरातील दुकाने सध्या सायंकाळी सात वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ वाढवण्याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्तांशी चर्चा करून दि.15 सप्टेंबरनंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील लॉकडाऊन हटल्यानंतर दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. तसेच पुन्हा कोणत्याही परिस्थीतीत लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचेही यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
सध्याच्या आदेशानुसार दि.15 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे.