दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला मोठे यश मिळाले असून बब्बर खालसा इंटरनॅशनल अर्थात बीकेआयच्या दोन दहशतवाद्यांना दिल्लीच्या उत्तर पश्चिम भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून काही शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून राजधानीतील आणि पंजाबमधील काही बडे नेते यांच्या हिटलिस्टवर होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पकडण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते पंजाब पोलिसांच्या वॉन्टेडच्या यादीत समाविष्ट होते. भूपेंद्र ऊर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंह अशी त्यांची नावे असून दोघेही पंजाबच्या लुधियाना येथील रहिवासी आहेत. बुराडी येथील निरंकारी कॉलनी येथून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दिलावर सिंह याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. पंजाब पोलिसांनी त्याला अबुधाबी येथून अटक केली होती. मात्र, जामीन मिळाल्यापासून तो फरार होता.
दिल्ली पोलिसांना दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यावर ते त्यांच्या मागावर होते. मात्र, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मात्र, त्यांना पोलिसांनी घेराबंदी करून पकडले. शस्त्रे घेण्यासाठी ते दोघे दिल्लीत आले होते. त्यांच्याकडून सहा पिस्टले जप्त करण्यात आली आहेत. बब्बर खालसा इंटरनॅशनल ही पाकिस्तानस्थित संघटना असून संघटनेचा प्रमुख वाधवा सिंह बब्बर याच्यासह नऊ जणांना भारत सरकारने जुलै महिन्यात दहशतवादी घोषित केले आहे.