पुणे – शहरात दिवसा उकाडा आणि संध्याकाळी मेघगर्जनेसह पडणारा पाऊस, असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. रविवार सुट्टीचा दिवस संध्याकाळी देखील शहरात विजेच्या गडगटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाची ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय झाला असून, पुण्यातही गेल्या दोन दिवसापासून संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. रविवारी शहरात 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत 23.1 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली.
दरम्यान, शहरातील विविध भागामध्ये पडल्लेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचणे, ड्रेनेज लाइन तुंबणे असे प्रकार पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी रस्त्याचे कामकाज सुरू असल्याने साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडत होती. अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेले रस्तेही पाण्याच्या प्रवाहाने उखडले गेले.