लंडन – फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यासाठीच्या खटल्याला लंडनमधील न्यायालयात आजपासून सुरुवात होणार आहे. या खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होणार असून यासाठी नीरव मोदीला व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून सहभागी करून घेतले जाणार आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेतील सुमारे 2 अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी त्याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी भारताकडून करण्यात आली आहे. त्या याचिकेच्या आधारे हा प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. या प्रकरणी लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात ब्रिटनमधील क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसकडून भारताची कायदेशीर बाजू मांडण्यात येत आहे.
करोनाच्या साथीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे डिस्ट्रीक्ट जज सॅम्युएल गुझी यांनी मोदी याला या 5 दिवसांचा सुनावणीसाठी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. नीरव मोदी सध्या दक्षिण पश्चिम लंडनमधील वॅन्डस्वर्थ तुरुंगातच आहे.
या प्रकरणाच्या पहिल्या टप्प्याची सुनावणी मे महिन्यात झाली होती. त्यामध्ये नीरव मोदी विरोधात फ्रॉड आणि मनी लॉन्डरिंगचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसकडून युक्तीवाद करण्यात आला होता. नीरव मोदी विरोधात सकृतदर्शनी प्रकरण असल्याचे यावेळी ठासून सांगण्यात आले होते. भारत सरकारच्यावतीने नीरव मोदी विरोधात अधिक सबळ पुरावे दिले गेले असल्याने यासंदर्भातील सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. नीरव मोदीकडून साक्षीदारांना धमकावणे किंवा पुरावे नष्ट केले जाण्याच्या आरोपांवरही या सुनावणीत युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे.
प्रत्यार्पणाशी संबंधित खटल्याची पुढील सुनावणी 3 नोव्हेंबरला होणार आहे. तर 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखेरच्या सुनावणीच्यावेळी या प्रकरणाचा अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.