गणेश विसर्जन मिरवणुकीतील गेल्या 20 वर्षांतील नीचांकी नोंद
पुणे – गणेशोत्सवात विशेषत: विसर्जनाच्या दिवशी होणारे ध्वनिप्रदूषण हा अलीकडील काळात चिंतेचा विषय ठरत आहे. यंदा शहरातील लक्ष्मी रस्त्यावर गेल्या 20 वर्षांतील सर्वांत कमी ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात आली असली, तरी शहरातील इतर भागांमधील आवाज हा ध्वनीच्या प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे विविध नोंदीमधून समोर आले आहे.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि सीओईपी महाविद्यालयातील पर्यावरण विभागातर्फे गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषणाची नोंद घेतली जाते. एमपीसीबीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 22 ठिकाणी तर सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील 10 चौकांमधील ध्वनिप्रदूषणाची नोंद घेतली. गणेशोत्सव काळात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण हे विसर्जनाच्या दिवशी होत असल्याचे यापूर्वीच्या अभ्यासातून समोर आले आहे.
यंदा करोनामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका रद्द झाल्याने ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी असेल, अशी अपेक्षा अभ्यासकांकडून व्यक्त केली जात होती. त्यानुसार लक्ष्मी रस्त्यावर गेल्या 20 वर्षांतील सर्वांत कमी म्हणजेच तब्बल 59.8 डेसिबल इतके प्रमाण सीईओपी महाविद्यालयातर्फे नोंदविण्यात आले आहे. याबाबत महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर म्हणाले की, हा परिसर रहिवासी क्षेत्र असून त्याठिकाणी ध्वनीची कमाल मर्यादा 55 डेसिबल इतकी आहे. या वर्षीच्या नोंदी पाहता, लक्ष्मी रस्त्यावरील ध्वनीची सरासरी नोंद ही आपल्या कानासाठी आदर्श नसली तरी, सुसह्य नक्कीच आहे. करोनामुळे परिसरातील रहिवासी आणि शहरातील नागरिकांना एक वेगळा अनुभव घेता आला.
शनिवारपेठेत सर्वांत जास्त आवाज…
एमपीसीबीतर्फे मंगळवारी शहरात 19 ठिकाणी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार, शनिवार पेठ येथे सर्वांत जास्त म्हणजे 76.2 डेसिबल, तर कोरेगाव पार्क येथे सर्वांत कमी म्हणजे 60.5 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी ध्वनीची मर्यादा 70 डेसिबलपेक्षा जास्त अथवा त्यापेक्षा किंचित कमी असल्याची नोंद घेण्यात आली असून, हे प्रमाण ध्वनीच्या कमाल मर्यादेपेक्षा सुमारे 20 डेसिबलने जास्त असल्याचे दिसून आले आहे.