नवी दिल्ली – राष्ट्रपतींनी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) खालील कर्मचाऱ्यांना जीवन रक्षा पदक प्रदान करून सन्मानित केले आहे.
उत्तर रेल्वेतील हवालदार दिवंगत जगबीर सिंह यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले. तर पश्चिम रेल्वेतील हवालदार शिवचरण सिंह आणि उत्तर पश्चिम रेल्वेतील मुख्य हवालदार मुकेश कुमार मीना यांना उत्तम जीवन रक्षक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
दिवंगत जगबीर सिंह यांनी कर्तव्यावर असताना आदर्शनगर-आझादपूर रेल्वे विभाग, दिल्ली जवळील रेल्वे परिसरात 4 मुलांचे जीवन वाचवताना आपले प्राण गमावले. अतुलनीय शौर्य दाखवत त्यांनी त्यांच्या कर्तव्याच्या सर्व सीमा ओलांडून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मुलांचे प्राण वाचवले.
10 ऑगस्ट 2019 रोजी रेल्वे क्रमांक 12959 मध्ये अनुरक्षण कर्तव्य बजावत असताना, शिमखयाली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे ट्रेन थांबली असता शिवचरण याच्या लक्षात आले की, काही लोकं पुरात अडकले आहेत आणि ते मदतीसाठी ओरडत आहेत. शिवचरण सिंग स्वत: च्या जीवाची पर्वा न करता, त्या लोकांना वाचवण्यासाठी धावले आणि 9 लोकांचे प्राण वाचवले होते.
पश्चिम रेल्वे आरपीएफचे जोधपुर विभागातील मुख्य हवालदार मुकेश कुमार मीना, हे 16 सप्टेंबर 2018 रोजी रेल्वे क्रमांक 22478 मध्ये ड्युटी बजावत असताना 2 मुलांसह 1 महिला प्रवाशाचे प्राण वाचवून उल्लेखनीय शौर्य दाखवले. मुकेश मीणा यांनी धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि त्या महिला प्रवाशाला तिच्या मुलांसह फलाट व ट्रेनमधील मोकळ्या जागेतून बाहेर काढले होते.