लोणावळा – करोना आजारामुळे लोणावळा शहरात रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला पुण्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला.
जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (दि. 29) देशमुख यांनी मावळ व मुळशी तालुक्याला भेट दिली. करोना संदर्भात केलेल्या उपाय योजनांची पाहणी केली. लोणावळा नगरपरिषदेने झालावाडी याठिकाणी उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरला त्यांनी भेट देत सुविधांची माहिती घेतली. तसेच खंडाळा येथे कंटेन्मेंट झोनची पाहणी करीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांशी चर्चा करीत सुविधा कशी मिळाली याबाबत चर्चा केली. या वेळी आमदार सुनील शेळके, पुणे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी भगवानराव पवार, प्रांतअधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहकरे, लोणावळा मुख्याधिकारी रवी पवार हे उपस्थित होते.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी झालावाडी कोव्हिड केअर सेंटर येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेत लोणावळा शहरातील रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी केली. लोणावळा नगरपरिषदेने आतापर्यंत करोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, कोव्हिड सेंटर तसेच नागरिकांना देत असलेल्या सुविधाबाबत जिल्हाधिकारी देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.
संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या
मावळ तालुका, लोणावळा शहरात करोनामुळे ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. अतिमहत्वाच्या कामाशिवाय ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू देऊ नका, घरातील अन्य सदस्यांनी बाहेर घरात गेल्यानंतर आपल्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या, मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, “फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करा व विनाकारण घराबाहेर पडू नका अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.