कर्जत – कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसताना कर्जत-जामखेडमध्ये करोना या जीवघेण्या महामारीच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागात राजकीय हस्तक्षेप करून अनेक नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याची टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलीआहे.
राम शिंदे यांनी नुकतीच कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामधील कोविड सेंटरला भेट दिली. त्यांनी यावेळी तेथे असलेले रुग्ण, त्यांची असलेली सर्व व्यवस्था, समस्या जाणून घेत पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
राम शिंदे म्हणाले कि, राज्यासह तालुक्यात करोनाने थैमान घातले असताना लोकांच्या जिवाशी काही नेते खेळत आहेत याचा त्यांना विसर पडला आहे. डॉक्टर व प्रशासन यांना या ठिकाणी काम करू द्यावे. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रामधील अनुभव महत्त्वाचा असतो. पण माहिती नसतानाही काहीजण हस्तक्षेप करीत आहेत, ही बाब नक्कीच योग्य नाही. तालुक्यात आज म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात करोना चाचण्या होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या आजारावर सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांच्यावर उपचार करणे हा एकमेव पर्याय असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येही राज्याच्या जीएसटीच्या थकबाकीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ‘रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावं’ अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांनी केल्याची बातमी मी पाहिली. नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली, याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं ‘अभ्यास’ करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.